इंडिया दर्पण विशेष EXCLUSIVE
नवी दिल्ली/मुंबई/नाशिक – बनावट पावत्यावर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्या-या दोन बोगस कंपन्याचा जीएसटी इन्व्हेस्टिगेशन विभागाने भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणा-या या दोन्ही कंपन्या एकाच पत्त्यावर एका छोट्याशा गाळ्यात असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी या विभागाने छापा टाकल्यानंतर येथे एक टेबल व दोन खुर्च्या आढळल्या. याबाबत सर्व रिपोर्ट नाशिकच्या कार्यालयाने मुंबई कार्यालयात सोमवारी पाठवले आहेत. तशी माहिती जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडिया दर्पणला दिली आहे.
गेल्या काही दिवसात सीजीएसटी नाशिक व नागपूर इन्व्हेस्टिगेशन विभागीय कार्यालयाने गुप्त माहितीच्या आधारे जोरदार कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत नाशिकच्या नामांकीत बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. त्यानंतर जामीनावरही सोडले. पण, या कारवाया अजून थांबलेल्या नाही. एकुण या प्रकरणात अनेक बनावट कंपन्याचा मोठे रॅकेट समोर आले आहे. त्यात या दोन नवीन कंपन्याचा भांडाफोड झाला आहे. याव्यतिरिक्त अजून २८ कंपन्या रडारवर आहे. त्यामुळे जीएसटी घोटाळ्याचे प्रकरण अनेकांच्या अंगलट येणार असल्यामुळे खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्या-या अनेक उद्योजक व बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अशी केली जाते फसवणूक
अस्तित्त्वात नसलेल्या कंपनीच्या बनावट पावत्यांवर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले जाते. या बनावट क्रेडिटचा उपयोग जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यासाठी केला जातो. खोटे इनपुट क्रेडिट घेतल्याचे आढळल्यामुळे या कारवाई सुरु आहे.