नाशिक – प्रभूरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त विशेष उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळेच अयोध्येत सोहळा संपन्न होत असतानाच नाशकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काही घरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये प्रभूरामचंद्रांची आरती करण्यात आली. तर, घराघरात आणि चौकांमध्ये श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. शहर परिसरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामांची पूजा केली. यावेळी आमदार राहूल ढिकले यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.