नाशिक – कोरोनाच्या संसर्गामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णांचे काटेकोरपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहरातील गोविंद नगर व पाथर्डी फाटा येथील प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराच्या भेटी दरम्यान दिल्या आहेत.
आज नाशिक शहरातील गोविंद नगर व पाथर्डी फाटा या भागात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त अर्चना तांबे, विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्यासह इतर अधिकारी व आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
या पाहणी दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन होते किंवा कसे याबाबत पाहणी केली. गृहविलगिकरणात असलेल्या रुग्णांची आरोग्य विभागामार्फत नियमित तपासणी करण्यात यावी, त्यांच्या हातावर गृहवीलगिकरणाचा शिक्का मारण्यात यावा तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रतीबंधित क्षेत्रातील बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिल्या आहेत.
आशा वर्कर्स यांच्यामार्फत करण्यात येणारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम कशा पद्धतीने होणे अपेक्षित आहे, बाधित व्यक्तीच्या कुटुंबियांच्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचा कामाच्या ठिकाणी किंवा अजून इतर ठिकाणी किती लोकांशी संपर्क आला याबाबत सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर्स यांना सांगितले. विभागीय आयुक्त श्री. गमे, जिल्हाधिकारी श्री. मांढरे व महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पाथर्डी फाटा व गोविंदनगर येथील प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांशी सवांद साधला. याचदरम्यान लाईफ केअर रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रास भेट दिली.
कोविड संदर्भात मुख्यालय स्तरावरुन देण्यात आलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.