नाशिक – इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंजच्या पॉप अप सायकल ट्रॅक आराखडा चाचपणीसाठी देशभरातील आठ शहरांनी आराखडा सादर केला आहे. त्या आठ शहरांमध्ये नाशिक शहरानेही त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी (दोन्ही बाजुने) व लगतचा परिसर हा आराखडा सादर केला आहे. नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहर केंद्र सरकारच्या इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी झाले आहे. सदर स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यात ११ शहरांची निवड करण्यात येणार असून, त्या शहरांना सायकलिंगसाठी पायाभूत सुविधा उभ्या करणेकामी १ कोटी रुपये मिळणार आहेत, त्यादृष्टीने नाशिक स्मार्ट सिटी पहिल्या अकरामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे.
दुसऱ्या टप्प्यात ज्या शहरांची निवड होईल त्या शहरांना इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज या उपक्रमाअंतर्गत शहरामध्ये सायकलींग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी १ कोटी रुपये मिळणार आहेत.
निवड झालेल्या शहरांना खालील गोष्टी कराव्या लागणार आहेत.
1. कमीत कमी खर्चामध्ये पॉप अप म्हणजे तात्पुरते सायकल ट्रॅक उभारणे. त्याद्वारे सायकल ट्रॅकचे जाळे उभे करण्यात मदत होणार आहे.
2. वाहनरहीत मार्ग बनवणे म्हणजे एखाद्या मार्गावर वाहनांना नो एन्ट्री ठेवावी लागेल. फक्त सायकल वापरास परवानगी द्यावी लागेल.
3. पायलट सायकल ट्रॅक निर्माण करणे. उदा. स्मार्ट रोडवर बनविण्यात आलेला सायकल ट्रॅक.
4. समुदायाच्या नेतृत्वात सायकल जनजागृती व सायकल भाडे योजना राबवणे. यासाठी एनजीओची मदत घेणे.
5. विविध इव्हेंट्स व विविध माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना सायकलींगसाठी उद्युक्त करणे. अशा प्रकारे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात असलेला हा बदल कायम स्वरुपी बदलामध्ये रुपांतरीत करणे.
6. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्पोर्टेशन ॲण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP) हे सदर इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज या उपक्रमासाठी मार्गदर्शन आणि सर्वतोपरी मदत करणार आहेत.
7. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शनही मिळणार आहे.
खासगी वाहतुकीला सायकलींग हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर ऑफीस, शाळा आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी तसेच लहान मुले, वृद्ध यांच्यासाठीही सायकलींग सुरक्षित पर्याय असून, गरिब, श्रीमंत कुणीही सहज सायकल खरेदी करू शकते. लॉकडाऊनच्या काळामध्ये अचानक झालेली सायकलींगची वाढ अशीच कायम रहावी व त्यात वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सायकलचा पर्यावरणपूरक, आरोग्य संवर्धक असाही उपयोग होतो. सायकलच्या वापराने मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होण्यास मदत होईल.