नाशिक – शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील खासगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या २ टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
सध्या शहरातील खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यात आता संसर्ग झालेल्या रूग्णांवर उपचार सुरू करण्यासाठी सुमारे २० नवीन खाजगी रुग्णालयांनी महानगरपालिका तसेच शासनाकडे परवानगी मागितली आहे. याआधी नाशिक महानगरपालिकाने १६ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी परवानगी दिली आहे. नव्याने २० रुग्णालयांना परवानगी मिळाल्यास जवळपास ४०० बेड उपलब्ध होणार आहेत. मध्यंतरीच्या काळात शहरातील रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले होते. मात्र, खाजगी दवाखाने आता पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या शहरातल्या ७५ खासगी रुग्णालयांसह १९ रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ८६ रुग्णालयांमध्ये एकूण ४५०० बेड उपलबध करून देण्यात आले आहेत. उर्वरित ५६ रुग्णालयांमध्ये कोविड तसेच नॉन कोविड असे दोन स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकूण ६५० खासगी रुग्णालय आहेत. त्यात एकूण १० हजार बेड आहेत. यातील ७५ रुग्णालयातील २५०० बेड कोरोनासाठी राखीव आहेत.