नाशिक – मकर संक्रांत उत्सवाच्या निमित्ताने शहरासह जिल्ह्यात पतंगाचा आनंद नागरिक घेत असतात. मात्र, नायलॉन मांजाच्या वापरामुळे नाशिकमध्ये गेल्या दोन वर्षात ६६ पक्षांचा मृत्यू तर ३०० हून अधिक पक्षी जखमी झाले आहेत.
मकर संक्रांत आणि पतंगोत्सवाच्या आनंदात पतंग उडविण्यासाठी नागरिकांनी पशु-पक्ष्यांना हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन नाशिक पश्चिम भाग चे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, नायलॉन मांजा पशु पक्षी तसेच माणसासाठी देखील घातक आहे. नागरीकांनी जागरूक होऊन मकर सक्रांतीचा पंतगबाजीचा आनंद मुक्या पक्षी जीवांच्या मृत्यूचे कारण ठरणार नाही याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी स्वीकारून नायलॉन मांजा न वापरण्याबाबत जनजागृती करावी.
‘नायलॉन मांजा हद्दपार करूया, निसर्गाचा अस्सल दागिना सुरक्षित ठेवूया’ अशी शपथ प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेवून नायलॉन मांजावर बहिष्कार टाकण्याचे देखील आवाहन उप वनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक पंकज कुमार गर्ग यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.