नाशिक – शहरात नायलॉन मांज्याने महिलेचा बळी गेल्याची घटना ताजीच असताना इंदिरानगर परिसरात एक तरुण बालंबाल बचावला आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाची नायलॉन मांज्यामुळे मान कापली केली असून केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. या तरुणावर तातडीने उपचार करण्यात आले असून मानेवर सात टाके पडले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहरात पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर कुलकर्णी (३५) असे मांजामुळे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कुलकर्णी दुपारच्या सुमारास इंदिरानगर भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. हवेतून तुटून आलेला नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याभोवती घासला गेल्याने त्यांना मोठी दुखापत झाली. त्यांनी वेळीच दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. यावेळी परिसरातील नागरीकांनी धाव घेत तत्काळ कुलकर्णी यांना जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मांजामुळे गळ्याची त्वचा कापली गेल्याने त्यांना सात टाके पडले. सुदैवाने त्यांचे या दुर्घटनेत प्राण वाचले. नॉयलॉन मांजाचा वापर त्वरीत थांबविला जाणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटनांना आळा घालणे शक्य होणार नाही. नॉयलॉन मांजा हा नाशिककरांसाठी कर्दनकाळ ठरू लागला आहे.
हनुमानवाडीत युवतीही जखमी
मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडी कॉर्नरच्या सिग्नलवर एका दुचाकीस्वार युवतीच्या गळ्याला नायलॉन मांजाने दुखापत झाली. ही घटना बुधवारी घडली आहे. तत्पूर्वी महामार्गावर भारती जाधव नामक दुचाकीस्वार महिलेस आपला प्राण गमवावा लागला. या आठवड्यात अनेक ठिकाणी मांज्यात अडकल्याने तडफडणाऱ्या पक्षांचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केल्याच्या घटना ताज्या आहेत.
कठोर कारवाई करा
चोरी छुपी या मांजाची विक्री होत असल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून उघड होत आहे. एकीकडे नायलॉन मांजाचा वापर करू नये,नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा यासाठी सामाजिक,राजकीय व पर्यावरण प्रेमी संघटनांकडून जनप्रबोधन केले जात असतांना पोलीसांनीच आता कठोर पाऊले उचलणे गरजेचे झाले असून, कारवाईची मागणी होवू लागली आहे.