नाशिक – नायलॉन मांज्यामुळे ठार झालेल्या महिलेचा मृतदेह स्विकारण्यास तिच्या कुटुंबियांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी नकार दिला. महिलेच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. अखेर तहसिलदार अनिल दौंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आर्थिक मदतीसह मांज्या विक्रेत्यांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर सोमवारी (दि.२८) सायंकाळी नायलॉन मांजामुळे महिलेचा गळा चिरल्या गेला. त्यात ती मृत्यूमुखी पडली. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी नातेवाईकांसह आप्तस्वकिय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे मोठा जमाव जमला होता. सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीसांनी वेळीच धाव घेत जमावावर नियंत्रण मिळविले. जाधव या नोकरदार असल्याने त्यांच्यावर कुटूंबियाचा उदर्निवाह होता. या घटनेने ६ वर्षीय मुलासह कुटूंबियांचा पालन पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यांच्या कुटूंबियास तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी लावून धरण्यात आली. कुटूंबियांसह आप्तस्वकियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे जाधव यांचा मृत्यु झाल्याचा आरोप केला. याबाबत प्रशासनास निवेदन सादर करण्यात आला असून त्यात जाधव यांच्या मुलाचे शिक्षण, आरोग्य व नोकरीची हमी घेत तात्काळ आर्थिक मदत करावी. मांज्या बंदी बाबत जनजागृती करण्यात येवून पशू पक्षांसह कोणाचाही बळी जावू नये, यासाठी प्रशासनाने व संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करावी. मांजा विक्री करणाºयांवर कठोर कारवाई करावी आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. याबाबतचे निवेदन तहसिलदार अनिल दौंडे यांना सादर करण्यात आले.