नाशिक – बंदी असलेला धोकादायक नायलॉन मांजामुळे गळा चिरून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस येथील उड्डाणपुलावर झाली. शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून, प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी आता होवू लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती मारुती जाधव (वय अंदाजे ३० ते ३५) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. हिरावाडी भागात राहणाऱ्या भारती जाधव कामावरून घराकडे परतत असताना ही घटना घडली. सायंकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावरून त्या आपल्या दुचाकीवरून घराकडे निघालेल्या असताना ट्रॅक्टर हाऊस येथे त्यांचा मांजामुळे गळा चिरला गेला. यामुळे त्या दुचाकीवरून खाली पडल्या. साधारणत: दहा मिनीटे त्या तिथेच पडून होत्या. भद्रकाली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तसे डॉक्टरांनी घोषित केले.