नायगाव – क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा जन्मदिवस आज ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा होत आहे, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व महिला शिक्षण दिनानिमित्त आज नायगांव, ता.खंडाळा,जि. सातारा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले त्यानंतर ते बोलत होते.
यावेळी शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, सहकार पणन आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, बापू भुजबळ, शिवाजीराव नलावडे, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, डॉ.शेफाली भुजबळ, दिलीप खैरे, प्रित्येश गवळी, ऍड. सुभाष राऊत, सुधीर नेवसे, बाळासाहेब कर्डक, रविंद्र पवार, प्रा दिवाकर गमे, कविता कर्डक यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाचा प्रभाव आणि निवडणुकीची आचारसंहिता यामध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा उत्सव साजरा होत आहे. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. कारण केवळ १५ दिवसांपूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण प्रस्ताव दिला होता. त्यानुसार महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या कार्याला न्याय देण्याचे काम राज्याच्या महाविकास आघाडी शासनाने केले असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या देशात बहुजन समाजाला शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी केले. महिलांना, शुद्राना ज्यावेळी शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं त्यावेळी न डगमगता त्यांनी शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम केलं. त्यांच्या या अलौकिक कार्याबद्दल ब्रिटीश सरकारने यांच्या कार्याचा गौरव केला आहे. तर तुम्ही आम्ही का त्यांचा सन्मान का करू नये असा सवाल करत त्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे असे त्यांनी सांगीतले. तसेच ज्या महिलांना सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले त्यामुळे आज महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री पदी वर्षा गायकवाड या महिला यशस्वीपणे काम करत असून आज ‘सावित्री उत्सव’ साजरा होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी अनेक अडचणी असताना सुद्धा महिलांना शिक्षण देण्याचे काम केलं. महिला शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले यांनी रोवला त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिला या अग्रेसर दिसत आहेत. आज प्रत्येक विभागाचे निकाल आले त्यात बारावी, दहावी किंवा अगदी स्पर्धा परिक्षेत मध्ये सुद्धा आज महिला ह्या अग्रेसर असल्याचे सांगितले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र सरकारने ‘महिला शिक्षण दिन’ साजरा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्व स्तरावर ‘महिला शिक्षण दिन’म्हणून साजरा करत आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.