नाशिक – कोरोना संसर्गामुळे नामको चॅरिटेबल संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी ऑनलाईन घेण्यात आली. या सभेत संस्थेच्या सभासदांना संस्थेद्वारे देण्यात आलेल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे वेबपोर्टलच्या माध्यमातून हजर होते. सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी गेल्या वर्षभरात रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचा २४ हजार ७६३ रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती दिली. रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी आधार ठरलेल्या रुग्णालय परिसरातील सेवा सदनाचा लाभ १२ हजार ४३२ रुग्णांनी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांना निवासासोबतच भोजनसेवादेखील मोफत देण्यात आल्याचे ते म्हणाले. रुग्णालयात सद्यस्थितीत ५५ डॉक्टर कार्यरत आहेत. पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत या योजना लागू करण्यात आल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा ८ हजार १५६ तर, आयुष्यमान भारत योजनेचा १०८ रुग्णांनी लाभ घेतल्याचीही त्यांनी सांगितले.
ही सभा संस्थेचे अध्यक्ष भंडारी यांच्या हस्ते आणि सर्व पदाधिकारी व विश्वस्तांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सभेला सुरुवात झाली. प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले. दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजलीने सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. ज्या विश्वस्त, सभासदांची विविध संस्थांवर निवड झाली, त्यांचे व सभासदांच्या यशस्वी पाल्यांचे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात भंडारी म्हणाले की, डॉक्टरांना देवदूत का म्हणतात याची प्रचिती नागरिकांनी घेतली. म्हणूनच आपण आरोग्य क्षेत्राशी निगडीत संस्थेच्या एसजीएस रुग्णालयाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. विविध योजनांमुळे हे रुग्णालय ‘गरिबांना परवडणारे व श्रीमंतांना आवडणारे बनले’. विशेष म्हणजे दर्जेदार आरोग्य सुविधांमुळे रुग्णालयाचा नावलौकीक थेट राज्याबाहेरदेखील पोहोचला. रुग्णालयाच्या प्रांगणातील संस्थेच्या नर्सिंग महाविद्यालय वैद्यकीय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यास हातभार लावते आहे. या महाविद्यालयाची प्रगतीदेखील दिमाखात सुरू आहे. सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि हितचिंतकांमुळे ही दैदीप्यमान वाटचाल शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.
–
भविष्यातील योजना ठरणार लक्षवेधी – सचिव शशिकांत पारख
नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख यांनी या सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन करून सभेच्या कामकाजास प्रारंभ केला. संस्था व हॉस्पिटल सर्वसामान्य रूग्णांना सर्वोत्तम रूग्णसेवा देण्यास कटीबध्द आहे. हा प्रवास असाच सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पारख यांनी यावेळी भविष्यातील योजनांचा आढावाही घेतला. हृदयरोगावरील उपचारांसाठी अत्याधुनिक कॅथलॅबसह कार्डियाक केअर सेंटर, रक्ताचे आजार व कर्करोगावरील उपचारांसाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट विभाग उभारतानाच शैक्षणिक विस्ताराच्या दृष्टीने महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत प्रस्तावित आहे. याशिवाय रुग्णालयातील विविध विभागांचे अत्याधुनिकीकरणही केले जाणार आहे. सद्यस्थितीत ४ सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहेत. योजनाबाह्य रुग्णांसाठी स्वतंत्र आयपीडी विभाग, दाखल रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा मानस आहे. तसेच, नवीन २०० बेड्स वाढवण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने कामकाज प्रगतीपथावर असल्याचेही पारख यांनी सांगितले.