महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना -संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांची मागणी
….
नाशिक – नाफेडच्या माध्यमातून १५ हजार टन कांदा आयात करून मुंबई बंदरावर ५ हजार रुपये क्विंटल दराने उपलब्ध होणाऱ्या कांद्यामुळे राज्यातील कांद्याचे भाव पडून कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याऐवजी नाफेडने नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमधून हा कांदा ५हजार रुपये क्विंटल या दराने खरेदी करावा व कांदा उत्पादकांचे होणारे नुकसान थांबवावे. लॉकडाऊनच्या काळात ५०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याला दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये साठवलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कांदा हा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत विकला गेला आहे. उर्वरित कांद्यापैकी ५० टक्के कांदा हा चाळींमध्येच सडल्याने शेतकऱ्यांच्या जवळ असलेल्या अगदी थोड्याफार कांद्याला चांगला दर मिळत असताना, केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात कांद्यावर निर्यातबंदी केली तसेच परदेशी कांदा आयात करून कांदा व्यापाऱ्यांना कांदा साठवणूक मर्यादा घालून दिल्याने या सर्व घटनांचा परिणाम गेल्या आठवड्यापासून कांद्याचे बाजार भाव कमी होण्यामध्ये झाला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असतांना फक्त ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्यांना मारक ठरत असून राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये सरकार विरोधात मोठी संतापाची लाट आहे दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीत आणत आहेत परंतु बाजार भावात गेल्या सोमवारपासून झालेली मोठी घसरणीमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी नाफेडची कांदा खरेदी परदेशातून आयात केलेल्या कांद्याऐवजी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करून घेण्यासाठी केंद्राला भाग पडावे यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दिघोळे यांनी केली.