मुंबई – काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव यांचे नाव निश्चित झाल्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे हा राजीनामा दिला आहे. बुधवारी पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता. काँग्रेसने अद्याप अधिकृतपणे पटोले यांचा नाव जाहीर केले नसले तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे मात्र त्यांची निवड निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये अनेकांची नावे चर्चेत आली आहे. त्यात संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांचे नाव आघाडीवर आहे. गेल्या काही महिन्यापासून काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद बदलाच्या जोरदार हालचाली सुरु होत्या. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे याअगोदरच दिल्लीत गेले होते. त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. पण, नावावर एकमत होत नसल्यामुळे यासाठी बराच काळ गेला. पण, अखेर पक्षनेतृत्वाने पटोले यांना पसंती दिली.