नाशिक – पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा नातेवाईकाने विनयभंग केल्याची घटना पंचवटी परिसरात घडली. यावेळी दोघा संशयितांनी ‘आमच्या भांडणात पडला तर कुटूंबियास हातपाय तोडण्याची’ धमकी दिली असून काका पुतण्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पांडे आणि सोमेश पांडे (रा. गोरेवाडी, नाशिकरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. ते दोघे काका-पुतणे आहेत. याप्रकरणी पंचवटीतील जनार्दन स्वामी नगर भागात राहणाऱ्या विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. पिडीतेची नणंद आपल्या माहेरी आल्याने संशयित काका-पुतणे गुरुवारी (दि.१) रात्री तिच्या घरी आले होते. सासरी जाण्याच्या कारणातून नणंद आणि नंदई मध्ये वाद झाला. यावेळी नंदईने आपल्या पत्नीस मारहाण केली. त्यामुळे पिडीतेसह तिचा पती आणि सासरे वाद मिटवित असतांना ही घटना घडली. यावेळी संशयीतांनी सासरकडील मंडळीस शिवीगाळ व धक्काबुक्की करीत आमच्या भांडणात पडला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. तर नंदई समवेत आलेल्या त्याच्या पुतण्याने महिलेचा विनयभंग केला. दोघा संशयीतांना पोलीसांनी अटक केली असून अधिक तपास जमादार बी. व्ही. वाघ करीत आहेत.