नाशिक – नाट्यक्षेत्रातील कलावंतांनाही आता रंगभूमीवर परतण्याची ओढ लागली आहे. त्याच अनुषंगाने शहरातील ‘नाट्यरसिक’ या लोकप्रिय ग्रुपतर्फे गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आगामी नाट्यमहोत्सवासाठी सादर होणाऱ्या नाट्यसंहितांचे पूजन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा झाली. लॉकडाऊनचे पडसाद सर्वच क्षेत्रांवर पडत असल्याने नाट्यक्षेत्र देखील चार महिन्यापासून ठप्प आहे. परंतु पण गेल्या महिन्याभरापासून देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शहरातील नाट्यचळवळीत नेहमी नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी नाट्यरसिक ग्रुप नेहमी सक्रिय असतो. यंदा मे महिन्यात आयोजित करण्यात आलेला नाट्यमहोत्सव कोरोना महामारीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. परंतु आता देशात हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असल्याने संहिता पूजन करण्यात आले. यंदाच्या नाट्यमहोत्सवात पाच एकांकिका सादर होणार आहेत. सैराट आणि मुळशी पॅटर्न या लोकप्रिय चित्रपटातील अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र्र चित्रपट महामंडळचे संचालक मिलिंद तारे, नाट्यरसिक ग्रुपचे प्रमुख श्रीराम वाघमारे व इतर सदस्य उपस्थित होते.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन यावेळी करण्यात आले. चर्चा आणि गप्पांच्या साथीने सिनेक्षेत्रातील प्रवास विश्वकर्मा यांनी उलगडला. त्याचबरोबर नाटक आणि चित्रपट यांसह विविध विषयावर चर्चा झाली. नाट्यरसिकच्या माध्यमातून शहरातील नवोदित लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. मृगजळ, सेम टू सेम, रंगकर्मी, बासुंदी (बाई सुंदर दिसते) आणि अधर्मयोध्या या एकांकिका सादर होणार आहेत.
प्रतिक जोशी यांनी विधीवत श्लोकपठनासह पुजा सांगितली तर पुजा सोनार हिने सुत्रसंचालन केले. प्रशांत गरूड, कविता आहेर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी महेंद्र आहेर, श्रिया जोशी, क्षमा देशपांडे, कल्पेश कुलकर्णी, जयदीप पवार, रविराज वरखेडे, प्रसाद देशपांडे, राजेंद्र चिंतावार, रचना चिंतावार, मयुर थोरात, नरेंद्र सोनवणे, अनिता सोनवणे, अश्विनी कासार, जयश्री कुमावत, सिध्दी बोरसे, वैभवी सुलक्षणे, राजेंद्र झाल्टे, दिपक गोसावी, रविंद्र जगताप, कावेरी जगताप, संदिप पवार उपस्थित होते.
मी ह्या नाट्य चळवळीचा भाग आहे ह्याच आणि मी नाट्यरसिक आहे ह्याचा अभिमान आहे
व्वा! मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा