सटाणा – गत महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर आज सेनेचे कान्हू आहिरे यांचा राजीनामा सभापती इंदूबाई ढुमसें व गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच राज्यातील महाविकास आघडीचा पॅटर्न बागलाण पंचायत समितीत राबविण्यात माजी आमदार संजय चव्हाण यांना यश आले होते.
राष्ट्रवादीचे चार काँग्रेसचे दोन सेनेचा एक तर अपक्ष एक असे ८ सदस्यांची मोट बांधत पंचायत समितीवर राष्ट्रवादीच्या सभापती इंदूबाई ढुमसे तर सेनेचे उपसभापती कान्हू आहिरे यांना संधी देण्यात आली होती. १४ सदस्य संख्या असलेल्या बागलाण पंचायत समितीत भाजपाचे ७ संख्याबळ असताना सत्तेपासून वंचित ठेवण्यात आले होते. वर्षभराच्या काळानंतर काँग्रेसच्या एका सदस्याला उपसभापती होण्याचे डोहाळे लागल्याने सेनेचे उपसभापती कान्हू आहिरे यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी या सदस्याने भाजपाच्या काही सदस्ययांची मोट बांधण्यास सुरुवात केली.
राष्ट्रवादीशी प्रामाणिक असलेल्या सभापती इंदूबाई ढुमसे यांनी सत्ताधारी सदस्य बरोबर राहण्याचा योग्य निर्णय घेत या राजकीय उलथापालथी मधील हवा काढून घेतली होती. माजी आमदारांच्या शब्दाला आणि पक्ष सांगेल तो आदेश मानणार असल्याचे सांगत आपला निर्णय पक्षाकडे सोपविल्यानंतर आहिरे यांच्यावरील अविश्वासाचा निर्णय एक महिनाभर लांबणीवर पडला होता. मात्र या महिन्याभराच्या कालावधीनंतर पंचायत समितीमधील सदस्यांच्या अंतर्गत धुसफुसी नंतर आज सेनेचे आहिरे यांनी स्वतः राजीनामा दिला. या राजीनाम्यावर सूचक म्हणून अशोक उखाजी अहिरे यांनी तर सूचक म्हणून काँग्रेसचे रामदास पवळू सूर्यवंशी यांनी स्वाक्षरी केली आहे.
आता कुणाची वर्णी
या राजीनामा नाट्यानंतर भाजपाच्या काही सदस्यांसोबत अन्य पक्ष्याचे काही सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. यापूर्वी दोन वेळा उपसभापतीपदाची हुलकावणी मिळालेल्या ज्योती आहिरे यांची यंदा वर्णी लागण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.