नागपूर – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पालकमंत्री नितीन राऊत यांनी अखेर कठोर निर्णय जाहिर केला आहे. येत्या १५ ते २१ मार्च दरम्यान नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन राऊत यांनी केले आहे. नागपूर महापालिका हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी या तीन भागातही लॉकाडऊन लागू केला जाणार आहे. लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून सर्व खासगी, सरकारी व अन्य कार्यालये बंद राहणार आहेत. नागपूरमध्ये काल दिवसभरात तब्बल १७१० कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनचे कडक पालन केले जाणार आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.