नवी दिल्ली – कोरोना संसर्गाची दिवसेंदिवस वाढती गती रोखण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणेच दिल्ली, चंंदीगडमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाचे संक्रमम टाळण्यासाठी किमान १२ तासाचा खंड यानिमित्ताने पडेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, ही रात्रीची संचारबंदी निरुपयोगी असल्याची बाब समोर आली आहे. आरोग्य तज्ज्ञांनीच तशी माहिती दिली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू प्रभावी ठरणार नाही, असे मत व्यक्त करत सरकारच्या या कारवाईला काही आरोग्य तज्ज्ञांनी प्रशासकीय ढोंग म्हटले आहे. या उलट कोरोनाशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास महत्त्वपूर्ण व योग्य परिणाम होऊ शकतो. नाईट कर्फ्यूचा वापर महाराष्ट्रातही अयशस्वी ठरला आहे, असे देखील या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बघा, यासंदर्भात आरोग्य तज्ज्ञ काय म्हणताय…
प्रसार होण्याची भीती जास्त
कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात की, कोरोनापासून संरक्षणाच्या नियमांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे आहे. शहरात दिवसभर अनेक लोक गर्दीत भटकत राहतात. त्यामुळे रोगाचा प्रसार अधिक होत राहिल्यास रात्रीचे कर्फ्यू लावून काही फायदा होणार नाही. म्हणून, लोक दिवसा कोरोना नियमांचे पालन निश्चित करणे आवश्यक आहे.
वैज्ञानिक पुरावे नाहीत
एम्समधील औषध निर्माणशास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या कर्फ्यूने संसर्ग रोखण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. हा एक प्रकारे प्रशासकीय तमाशा आहे. त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल असोसिएशनचे वित्त सचिव डॉ. अनिल गोयल हे देखील नाईट कर्फ्यूच्या विरोधात असून ते म्हणतात की, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला प्रथम गर्दी दूर करावी लागेल. ज्या ठिकाणी गर्दी जमा होत आहे, तेथे निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
त्रिसूत्रीच सर्वात प्रभावी
मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि साबणाने हातांची नियमित स्वच्छता करणे, ही त्रिसुत्री म्हणजे सर्वात प्रभावी उपाय आहे. तसेच गर्दी होत असलेल्या बाजारपेठांमध्ये अॅड-इव्हन फॉर्म्युला लागू करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाजारामध्ये एक बाजूची दुकाने एक दिवस बंद करावीत. दुसर्या दिवशी दुकाने दुसर्या दिवशी बंद असावीत. याशिवाय वस्तू, रेल्वे स्थानक, बस स्थानकात शारीरिक अंतराचे नियम पाळले पाहिजेत. रात्रीच्या कर्फ्यूमुळे काहीही होणार नाही, असे मत दिल्ली मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. अश्विनी गोयल यांनी व्यक्त केले.