महापौर व उपमहापौरांना दिलासा
नांदेड ः महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकांसाठी पुढील तीन महिन्यांकरिता पुढे ढकलण्यास व या दोन्ही पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात अध्यादेशात सुधारणा करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर व उपमहापौर पदाचा प्रचलित अडीच वर्षाचा पदावधी दिनांक ०१.०५.२०२० मध्ये संपुष्टात येत असल्याने व कोरोना विषाणुमुळे उद्भभवलेल्या आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीमुळे तेथे निवडणुका घेणे शक्य नसल्याने महापौर/ उपमहापौर यांच्या निवडणुका कोविड-१९ च्या संक्रमणामुळे 3 महिने पुढे ढकलणे व विद्यमान महापौर/उपमहापौरांना मुदतवाढ देणे यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला होता.
हा अध्यादेश २७.०४.२० पासून अंमलात आला असून, ३ महिन्यांच्या कालावधीकरीता म्हणजेच दि.२७.०७.२० पर्यंत सदर मुदतवाढ लागू आहे. उपरोक्त अध्यादेशाद्वारे दिलेली मुदतवाढ दि.२७ जुलै २० रोजी संपत असल्याने, तसेच अद्यापही राज्यामध्ये कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव कायम असल्याने, महापौर निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने सदर अध्यादेशाद्वारे दिलेली मुदतवाढ पुढील ३ महिन्यांसाठी वाढविण्यास्तव अध्यादेशात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली.