नांदेड – कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी जाहीर केली आहे. सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र शिख समुदायातर्फे होळीनिमित्त काढण्यात येणार्या हल्लाबोल मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सोमवारी हातात शस्त्र घेऊन जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तलवारी घेऊन जमावाने गुरुद्वारातून निघून पोलिस बॅरिकेडिंग तोडले आणि नंतर पोलिसांवर हल्ला केल्याचे दिसत आहे.
सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे दरवर्षी होळीनिमित्त हल्लाबोल मिरवणूक काढली जाते. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत मिरवणूक काढू नये. शीख समुदायाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु तरीही उत्साही तरुणांनी हल्लाबोल मिरवणूक काढून रस्त्यावर लावलेले बॅरिकेड्स तोडले. हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण केली. पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यात पोलिस अधीक्षकांचे अंगरक्षक दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह चार-पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनीही भेट दिली. हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षकांच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.