नांदगाव – तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील ग्रामपंचायतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र हिसवळ खुर्द या ठिकाणी गुढीपाडव्याचे औचित्य साधून आरोग्याची गुढी उभारली. गावात प्रत्येक जण आपल्या घरी गुढी उभारत असतांना ग्रामपंचायत सदस्यांची आरोग्याची गुढी उभारल्यामुळे हा विषय आजूबाजूच्या गावातही कुतहूलचा ठरला.
ही गुढी उभारण्याचे कारण सांगतांना ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सांगितले की, जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातही या आजाराने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे सर्वत्र एक भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सर्व सुरू असताना आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करून मेहनत घेताना दिसत आहे. मेहनत नव्हे तर ते खऱ्या अर्थाने आज परमेश्र्वराचे दूत म्हणून एक देवदूताच काम स्वतः परमेश्वर म्हणून करीत आहेत. अशा या पवित्र ठिकाणी सुद्धा गुढी उभारली पाहिजे. म्हणून ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आजच्या या हिंदु नववर्षाच्या निमित्ताने गुढी उभारून. एक चांगला संदेश समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोग्य केंद्रातर्फे दक्षता घ्यावी म्हणून मास्क लावावे यासाठी गावात फिरून अवाहन केले आहे. तसेच गावात प्रतिबंधक फवारणी केली. बॅनर लावून जनजागृती करण्यात आली. या आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचे काम सोमवार, बुधवार व शुक्रवारी सुरू असते या ठिकाणी आजपर्यंत तालुक्यातील सर्वात जास्त लसीकरणाचे काम करण्यात आले आहे. जवळपास चार हजार पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन लसीकरण करून घेतले आहे. येथील आरोग्य यंत्रणा अतिशय सतर्क असून गरज पडेल त्या त्या ठिकाणी पोचून सेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने येथिल आरोग्य अधिकारी डॉ. जगताप व त्यांची टीम करताना दिसत असते. याचाही या गावाला सार्थ अभिमान आहे.नुकत्याच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या ठिकाणी भेट देऊन येथील कामाबाबत समाधान व्यक्त केले होते.
यामुळेच या ठिकाणी आज आरोग्याची गुढी उभारण्याचे काम या ग्रामपंचायतीने केले आहे. यावेळी सरपंच- कैलास फुलमाळी, उपसरपंच- संजय आहेर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विलास आहेर, जय योगेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉक्टर पुंजाराम आहेर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब आहेर, माजी चेअरमन पोपटराव आहेर, माजी सैनिक रवींद्र आहेर, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आहेर, नवनाथ आहेर, वैशाली आहेर, मनीषा आहेर, सरस्वती लोखंडे, आदीसह संतोष आहेर, बाळासाहेब आहेर, शांताराम लोखंडे, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.