नांदगाव- येथील विश्व कर्मा मंदिर हनुमान नगर येथे श्री संत सेवालाल जयंती उत्सव नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी आमदार कांदे म्हणाले की, संत सेवालाल यांनी समाज प्रबोधन करुन समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा समाजाला महान संदेश दिला. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. बंजारा समाजातील एक आदर्श संत होऊन गेले. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करावा व समाजातील मुलांना शिक्षणाच्या ओघात आणावे.
यावेळी आ. कांदे यांनी समाजासाठी समाज मंदिर आमदार निधीतून दिले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावर रामसिंग चव्हाण, सुभाष चव्हाण, विनोद पवार, सरदार राठोड, पंकज जाधव,मुळचंद मोरे, कैलास पवार, दर्शन आहेर,गिरणानगर ग्रामपंचायत सदस्य सचिन आहेर आदि उपस्थित होते. यावेळी नांदगाव परीसरातील साहित्यिक प्रा. सुरेश नारायणे, कवी. काशिनाथ गवळी, बाबुराव मानकरी व आदर्श शिक्षीका म्हणुन मोरेवाडी कासारी जि.प.शाळेच्या शिक्षीका कल्पना गुलाबसींग चव्हाण यांना पुरस्कार देण्यात आला. सर्व पुरस्कार्थीचा आ. कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.के. राठोड यांनी केले. तर पंकज जाधव यांनी आभार मानले.