नाशिक : वाखारी ता.नांदगाव येथील हत्याकांडाचा उलगडा करण्यात ग्रामिण पोलीसांना यश आले आहे. नऊ महिन्यानंतर चार दरोडेखोरांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांनी चोरीच्या उद्देशाने एकाच घरातील चौघांची निर्घुन हत्या केल्याची कबुली दिली आहे. संशयीतांच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत असून या टोळीवर मोक्कान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली.
सचिन उर्फ बोंग्या उर्फ पवन उर्फ रवि तथा धर्मा सखाहरी चव्हाण (रा.पढेगाव ता.कोपरगाव),सचिन विरूपण भोसले (रा.शिरोडी,वाळूंज जि.औरंगाबाद) व संकेत उर्फ संदिप महेंद्र चव्हाण (रा.केडगाव जि.अ.नगर हल्ली पढेगाव ता.कोपरगाव) अशी संशयीतांची नावे आहेत. ६ आॅगष्ट २०२० रोजी रात्री ही घटना घडली होती. नांदगाव तालूक्यातील वाखारी ते जेऊर मार्गावरील चव्हाण वस्तीवर हा दरोडा पडला होता. आण्णा पुंजाराम चव्हाण यांच्या शेतातील राहते घराच्या ओट्यावर झोपलेला मुलगा समाधान आण्णा चव्हाण (३५),सून भारती समाधान चव्हाण (२६) नात आराध्या समाधान चव्हाण (७) व नातू अनिरूध्द समाधान चव्हाण (५) आदींची धारदार शस्त्राने निर्घुन हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी मालेगाव तालूका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. दरोडेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होवू लागल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. तब्बल दिडशेहून अधिक संशयीतांना ताब्यात घेवून पोलीसांनी घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश येत नव्हते. त्यामुळे मारेकºयांना शोधून काढण्याचे आवाहन पोलीसां समोर उभे ठाकले होते. गेल्या नऊ महिन्यांपासून पोलीस यंत्रणा दरोडेखोरांच्या मागावर असतांना या दरोड्याचा सुत्रधार सचिन उर्फ बोग्या चव्हाण या काळात वाखारी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस त्याचा शोध घेत असतांना बोग्या चव्हाणचा मित्र महामार्गावरील ओझर नजीकच्या दहावा मैल भागात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी त्यास सापळा लावून जेरबंद केले असता त्याचे दोन्ही साथीदार पोलीसांच्या जाळयात अडकले. पोलीसांनी तिघांना वेगवेगळया भागातून जेरबंद केले असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने चोरी करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
चोरीच्या प्रयत्नात असतांना महिले पाठोपाठ संपुर्ण कुटूंबिय जागे झाल्याने त्यांचा खून करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. तिघा संशयीतांना न्यायालयाने सोमवार (दि.१२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयीत सराईत दरोडेखोर असून त्यांच्यावर औरंगाबाद,नगर आणि नाशिक जिह्यात दरोडा,जबरीचोरी,घरफोडी व अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. संशयीतांचे अन्य साथीदार हाती लागताच संबधीत टोळीवर मोक्कान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिक्षक पाटील यानी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कुमार सोने,जमादार रविंद्र शिलावट,हवालदार रविंद्र वानखेडे,नंदू काळे,संजय गोसावी,पोलीस नाईक विश्वनाथ काकड,सागर काकड,प्रविण सानप,सतिष जगताप,हरिष आव्हाड,शिपाई कुणाल मोरे,गिरीष बागुल,हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम,गौरव पगारे आदींच्या पथकाने केली.