नांदगाव- ग्रामसेवक मुख्यालयात राहत नाही पण मुख्यलयात राहत असल्याचे घर भाडे शासनाकडून घेत असतात अशा ग्रामसेवकांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते सुनिल सोनवनणे यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. या मागणीनंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना चौकशीचे आदेश दिले आहे. यामुळे अनेक ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.
नांदगाव तालुक्यात ८८ ग्रामपंचायती असून शासनाकडून या ग्रांमपंचायतीना वित्त आयोगाडून मोठा निधी प्राप्त होत असतो. त्यामुळे या ग्रांमपंचायतीचा विकास होणे गरजेचे आहे. पण, ज्या ग्रामसेवकावर मोठी जबाबदारी आहे. तेच मुख्यालयात राहत नाही. त्यामुळे कामे वेळेवर व मुदतीत होत नाही. त्यामुळे ग्रामसेवकाबाबत तक्रारी वाढल्या आहे. वास्तविक ग्रामसेवकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. पण, तसे होत नाही म्हणून ही चौकशी आता होणार आहे. या चौकशीत ग्रामसेवक मुख्यालयात राहत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.