नांदगाव- नांदगाव तालुका आता आंदोलनाची पंढरी झाली असून काम कुठलेही असो आता ते पूर्ण करण्यासाठी उपोषणाशिवाय,किंवा आंदोलन येथे केले जाते. त्यामुळे एका तरुणाने असेच काहीसे वेगळे आंदोलन केले व त्याची चर्चाही रंगली. सातबाऱ्याला नाव लावण्यासाठी दर्शन कैलास शिंदे या युवकाने हे आंदोलन केले. हे आंदोलन मंडळ अधिकाऱ्यांविरोधात होते. चक्क तहसीलच्या कौलावर चढून शिंदे याने आंदोलन केले. त्याने अगोदर तक्रारही केली होती. या तक्रार अर्जात केवळ गट नं ३१३ या शेत जमिनीच्या उताऱ्यावर व इतर अधिकारात नाव लावण्याबाबत मंडळ अधिकारी त्रास देत आहे. वेळ काढू पणा करून माझे काम करत नसून त्यामुळे मी तहसीलच्या इमारतीवर चढून आंदोलन करणार आहे असे सांगितले होते. तरी देखील त्याची तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शिंदे यांनी हा मार्ग निवडला.