नांदगाव – नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनी अमावस्येनिमित्त होणारा ‘ शनेश्वर ‘ यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. पण, पिंपरखेड येथील एका भाविकांने कोविड नियमांचे पालन करत महाअभिषेक व पूजा केली. यावेळी त्यांनी शनी मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरास सजवली.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व शनीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील श्री.क्षेत्र नस्तनपूर हे स्थान आहे. येथे शनी अमावस्ये निमित्त मोठी यात्रा भरते. लाखो भाविक शनी देवाचे दर्शन घेतात. पण, जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने गर्दी करण्यास तसेच सार्वजनिक कार्यक्रम यात्रा उत्सव साजरे करण्यास मज्जाव केल्याने शनेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण, अशा परिस्थितीतही द्राक्षांनी सजवलेली आरास मात्र चर्चेचा विषय ठरली.