नांदगाव – आरोग्य विभागातील अधिकारी व काही कर्मचारी त्रास देवून मानसिक छळ करतात असा आरोप करत नांदगाव तालुक्यातील ८ गट प्रवर्तक महिलां पाठोपाठ गुरुवारी सर्व १४७ आशा स्वयंसेविकांनी गट विकास अधिकाऱ्याकडे सामुहिक राजीनामे दिले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून एका वेळी सर्व गट प्रवर्तक आणि आशा वर्कर यांनी राजीनामे दिल्यामुळे माझं कुटुंब माझी जबाबदारी योजनेसह कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेली सर्व कामे ठप्प होणार आहे.आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेवून गट प्रवर्तक आणि आशा वर्कर यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे
गट विकास अधिकाऱ्याकडे आशा प्रवर्तक महिलांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की गेल्या १२ वर्षा पासून आम्ही आरोग्य विभागात वेगवेगळ्या प्रकारची तब्बल ७४ कामे करीत आहे. एवढे कामे करून देखील आम्हाला तुटपुंजे मानधन देण्यात येते या मानधनात आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे कठीण जाते तरी देखील एक समाजसेवा म्हणून आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करीत असतो,कोरोनाच्या काळात तर आम्ही आमचे जीव धोक्यात घालून गाव खेड्या पासून शहरा पर्यंत प्रत्येक गल्लीबोळात जावून रुग्णांची माहिती गोळा करतो, आता तर आम्हाला रुग्णाची ऑक्सिजन लेवल देखील चेक करावी लागत आहे. ऑक्सिजन चेक करतांना जर एखादा रुग्ण पॉझीटीव्ह असल्याचे आम्ही त्याच्या संपर्कात येवून आम्हाला आमच्या कुटुंबाला कोरोना होण्याची भीती आहे. तरी देखील आम्ही सर्व कामे करीत आहे मात्र गेल्या काही महिन्या पासून रुग्णांची माहिती ऑन लाईन भरण्यास सांगितले जात आहे. आमच्या पैकी काही महिला यांचे शिक्षण ७ वी ते ८ वी पर्यंत झाले आहे. अनेकांकडे चांगले मोबाईल फोन नाही त्यामुळे त्यांना ऑनलाईन माहिती भरणे शक्य नाही. विशेष म्हणजे ऑन लाईन माहिती भरण्याची जबाबदारी कार्यलयातील कर्मचाऱ्यांची असताना ते आमच्याकडे ऑन लाईन माहिती भरण्याची सक्ती करतात. यासह वेगवेगळ्या प्रकारे आरोग्य विभागातील अधिकारी व काही कर्मचारी त्रास देवून मानसिक छळ करीत आहे. या छळाला कंटाळून आम्ही सामुहिक राजीनामे देत असल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे. गट प्रवर्तक आणि आशा वर्कर यांनी सामुहिक राजीनामे दिल्यामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्था तर कोलमडणार आहेच शिवाय माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि कोरोना काळात केली जाणारी सर्व कामे देखील ठप्प होण्याची दाट शक्यात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून गट प्रवर्तक आणि आशा वर्कर यांचा मानसिक छळ करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.