नाशिक – नांदगाव तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत कोविड केअर सेंटरची संख्या पाचपटीने वाढविण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज नांदगाव तालुक्याच्या कोरोना सद्यस्थितीची आढावा बैठकीत दिल्या आहेत.
आज नांदगाव तालुक्यातील कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी येवला प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार उदय कुलकर्णी, मनमाड उप पोलीस अधीक्षक समरसिंग साळवे, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ससाणे, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ननावरे, नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. गोसावी, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. मुंडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, आयसीएमआर ने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णाची व्यवस्था असेल तरच संबंधित रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात यावे, अन्यथा त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये स्थलांतरीत करावे. तसेच एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्या एका रुग्णाच्या अनुषंगाने 10 हाय रिस्क व 20 लो रिस्क व्यक्तींची तपासणी करण्यात यावी. यासाठी नगरपालिका क्षेत्रात नगरपालिका प्रशासनाने व ग्रामीण भागातील तपासणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरित रॅपिड अँटीजन किट घेऊन तपासण्या कराव्यात. तसेच गृहवीलगिकरणात असलेला रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यावर 188 कलमानुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यंत्रणांना दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या आस्थापना कोरोना नियमांचे पालन करणार नाहीत, तसेच जीवनावश्यक वस्तू विक्रेते दुकानदार प्रशासनाने ठरवून दिलेले कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करतील अशा आस्थापना व दुकाने देखील सील करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी हॉटेलमधील 50 टक्के उपस्थिती प्रत्यक्ष तपासणी करून त्याबाबत नियम भंग करण्यावर कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत सांगितले.
त्याचप्रमाणे मनमाड येथील रेल्वे प्रशासनाच्या रुग्णालयातील काही बेड्स अधिग्रहित करून कोविड केअर रुग्णालयाच्या अनुषंगाने आवश्यक सुविधा पुरवून तेथे कोविड केअर रुग्णालय सुरु करण्याच्यादृष्टीने रेल्वेचे विभागीय नियंत्रक श्री विवेक गुप्ता यांच्याशी त्यांनी चर्चा केली. श्री विवेक गुप्ता यांनी याबाबत सहमती दर्शवून ऑक्सीजन सिलेंडर चा सुध्दा पुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली त्यानुसार हे कोरड सेंटर लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मनमाड भेटी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी कोविड केअर सेंटर येथे जाऊन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच प्रतिबांधित क्षेत्रास भेट देऊन तेथे कोरोनाबाबत नियमांची काटेकोरपणे अमंलबजावणी होत आहे कोरोना ग्रस्त रुग्णाशी समक्ष चर्चा करून पाहणी केली.