लेखक – सचिन गवळी
नाशिक जिल्ह्यातील बोराळे (ता. नांदगाव) या गावाने विविध विकासकामे तडीस नेत प्रगतीकडे लक्षणीय वाटचाल केली आहे. लोकसहभाग आणि ग्रामस्थांची एकजूटच त्यामागे कारणीभूत ठरली आहे. कायम पाणी टंचाईच्या विळख्यात असलेल्या या गावाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून गावात पाणी आणले असून शासनाची महत्वाकांशी योजना असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे. जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेत पहिल्यांदाच अभिनव पद्धतीने विचार करुन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या नवीन टाकीजवळ गावातील सर्व प्रभाग/गल्लीना पाणीपुरवठा करणाऱ्या वितरिकाना एकाच ठिकाणी व्हाल्व बसविण्याचा यशस्वी प्रयोग ग्रामपंचायतीने केला आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे गावातील सर्व प्रभागांना समान दाबाने व समान प्रमाणात पाणी वितरीत करणे शक्य झाले असून याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.
शेतीप्रधान असलेल्या या गावातील नागरिकांनी शेती व ग्रामविकास अशी दोन्ही बाबींची चांगली सांगड घातली आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर गिरणा नदीच्या काठावर बोराळे गाव वसले आहे. काही वर्षांपूर्वी विकासापासून वंचित असताना गेल्या काही वर्षांत मात्र विकासात भरारी घेणारे हे लक्षवेधी गाव ठरले आहे. शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभही गावाने घेतला आहे. गावाच्या वरच्या बाजूला साधारणतः चार किलोमीटर अंतरावर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे गिरणा धरण आहे. या धरणाचा फायदा नांदगाव तालुक्यातील बोटावर मोजण्याइतक्याच गावांना होतो. त्यात बोराळे हे देखील गाव आहे.
लोकसहभागातून विकास
बोराळे गावात उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच आहे. प्रगतीकडे वाटचाल करण्याबाबतीत ग्रामस्थांची एकी पाहायला मिळते. गिरणा नदीपात्रातील वाळू (रेती) किमती आहे. एकजुटीतूनच विस्तीर्ण नदीपात्रातील वाळू बोराळेच्या ग्रामस्थांनी सांभाळली आहे. आज त्यामुळेच गावाची परिस्थिती बदलणे शक्य झाले. वाळूंनी भरलेले भरगच्च नदीपात्र आज दिमाखाने मिरवते आहे. परिसरातील विहिरींतील पाणीपातळी सदैव टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे. गावात पहिली ते चौथी व पहिली ते सातवी अशा दोन शाळा आहेत. दोन्ही डिजिटल आहेत. गावाचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ६२३ हेक्टर आहे. बहुतांश जमीन बागायती स्वरूपाची आहे. केळी, ऊस, कांदा, कपाशी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. शेतकरी सुधारित यंत्रांचा वापर करतात. पीक उत्पादकता समाधानकारक असते. बोराळे गाव नदीपात्रामुळे दोन विभागलेले आहे.
नांदगाव तालुक्यातील पहिले स्मार्ट ग्राम
सन २०११ च्या जनगणनेनुसार बोराळे गावाची लोकसंख्या २१९८ आहे. विमुक्त जमाती लोकसंख्या सर्वाधिक आहे. गावाला २०१६-१७ साठी शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या स्मार्ट ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गतही तालुका स्तरावर द्वितीय पुरस्कार गावाला मिळाला आहे. गावात भूमिगत गटार आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ही कामे प्रस्तावित आहेत. गावातील उघड्या गटारी बंद झाल्याने डासांचे प्रमाण व पर्यायाने रोगराईचे प्रमाण कमी झाले आहे. २०१६ मध्ये गाव हागणदारीमुक्त झाले आहे.
पाणीपुरवठा योजनेचा प्रवास
पाणी टंचाई कायमची समस्या गावासाठी होती. पाणीटंचाईवर कशी मात करायची यावर विचार करताना या ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पवार यांनी गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना घेण्याचे ठरवले. या कामी त्यांना ग्रा.पं.चे उपसरपंच आणि सर्व सदस्य यांनी सर्वानुमते ग्रामसभेत ठराव मंजूर करून पेयजल योजना घेण्यास संमती दिली. या र्वी ग्रा.पं.मध्ये १९९७-९८ सालात जिल्हा परिषद सेसमधून नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होती मात्र लोकसंख्या वाढीबरोबर सदर योजना स्त्रोत कमी पडत असल्याने पाणी टंचाई जाणवत होती तसेच लगतच्या वस्त्यांना वितरण व्यवस्था नसल्याने ते पाण्यापासून वंचित राहत होते त्यामुळे पाणीपुरवठा वितरण प्रणालीमध्ये अनियमितता होत होती. त्यामुळे गावाची पाणी क्षमता वाढवण्याबरोबरच जीर्ण झालेली जुनी वितरण बदलविण्याची गरज निर्माण झाली आणि शास्वत स्त्रोत तयार करण्यावर भर देण्यात आला. यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करून तो ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आला आणि सन २०१८-१९ या वर्षात फेब्रुवारी २०१९ मध्ये या नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली. ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ऑक्टोंबर २०१९ मध्ये प्रत्यक्ष योजनेच्या कामाला सुरुवात झाली. या योजनेला (रक्कम रु ७३,५४,३३०) ११ फेब्रुवारी २०१९ रोजी रोजी तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली असून सदर योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. योजनेंतर्गत विहीर, वितरण व्यवस्था, साठवण टाकी पूर्ण झाली असून पंपिंग मशिनरी प्रगतीत आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बोराळे नळ पाणी पुरवठा योजना असे नाव योजनेस देण्यात आले आहे.
योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाणी साठवण टाकीची क्षमता हि ७५,००० लिटर इतकी असून एकूण २४५० लोकसंख्येला पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये गढीची मागील वस्ती (१९०), महाराणाप्रताप नगर (२२) खळवाडी (१३) हे महसुली गाव आणि वाडी वस्त्या जोडण्यात आले आहे. गावातील नळ जोडणीचे काम पूर्ण झाले असून ५२५ नळ कनेक्शन देण्यात आले आहे. दरमाह ७५०० ली पाणी ह्या हिशोबाने पाणी पट्टी आणि त्यापुढील प्रत्येक युनिट साठी ठराविक दराने पाणीपट्टी आकारणी करण्यात येते तसेच गावात वैयक्तिक नळ जोडणीला प्राधान्य दिले असून सार्वजनिक नळ कोंडाळे बंद करण्यात आले आहे.
व्हाल्वची’ अभिनव संकल्पना :
या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हटले तर प्रत्येक गल्लीला समान दाबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी मुख्य नळ वाहिनीवर दोन मेन व्हाल्व ठेवण्यात आले असून एका व्हाल्ववर चार पाईप लाईन, तर दुसऱ्या व्हाल्ववर चार पाईप लाईन असे विभाजन करून ८ गल्ल्यांना सामान दाबाने मेन रायझिंग वरून पाणी पुरवठा करण्याचा कल्पक वापर करण्यात आला आहे. अनेक योजना मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वस्ती साठी वेगळे व्हाल्व ठेवले जातात त्यामुळे समान पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही या योजनेत मात्र एकत्रित व्वाल्व सिस्टीम असल्याने सर्वाना समान आणि पुरेसे पाणी मिळत असल्याने कोणाचीही तक्रार नाही. तसेच एकाच ठिकाणी हे सर्व व्हाल्व असल्याने पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रत्येक गल्लीत न जाता एकाच ठिकाणाहून एकाच वेळी सर्व गावाला पाणी सोडता येते. त्याच प्रमाणे सर्व नळांना १५ व्या वित्त आयोगातील बंधित निधीतून वाटर मीटर बसवण्यात आले आहेत.तसेच नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी क्लोरीनेटर या यंत्राद्वारे पाणी शुद्धीकरण केले जाते. त्यामुळे विहिरीच्या पाण्यात टी.सी.एल पावडर न टाकता ती क्लोरीनेटर यंत्रात टाकली जाते.
पाणी पुरवठ्याच्या वेळेतही कल्पकता :
गावात ७० टक्के श्रमजीवी लोक राहतात.दिवसभर हे लोक मजुरी करतात त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. महिलांचा आणि पाण्याचा जास्त संबंध असल्याने कामावरून घरी आल्यावर सायंकाळी महिलांना पाणी भरणे शक्य असल्याने त्या वेळेत पाणी सोडले जाते त्या मुळे महिलांच्या वेळेनुसार त्यांना पाण्याचा योग्य वापर करता येतो व पाण्यामुळे रोजगारही बुडत नाही.
एकूणच नाशिक जिल्ह्यातील आजच्या घडीला ही एक आदर्श योजना आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील याची दखल घेतली असून ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यात बोराळे गावाचा धर्तीवर योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांना बोराळे गावास भेट देऊन संपूर्ण पाणी पुरवठा योजनेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
२४ तास पाणी पुरवठा करण्याचे आपले ध्येय
गावातील प्रत्येक नागरिकास घरातील नळाद्वारे २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आपले ध्येय असून त्यासाठी पाणी पुरवठा योजनेत काम करण्यात येत आहे. गावातील पाण्याची वितरण व्यवस्था पुर्ण करुन वैयक्तिक नळ कनेक्शन देण्याचे काम ग्रामपंचायतीने पुर्ण केले त्यानंतरच रस्त्यांच्या कांक्रिटीकरण व दुरुस्तीचे कामे हाती घेतली आहेत. १५ वित्त आयोगातुन उर्वरित नळ कनेक्शनसह वॉटर मीटर बसवुन त्याद्वारे २४ तास ५५ लिटर प्रतीव्यक्ती आणि प्रतीदिन पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन गावाने केले आहे
– राजेंद्र पवार, सरपंच, बोराळे
….
एकाच ठिकाणी व्हाल्वचा प्रयोग नाविन्यपूर्ण व उपयुक्त
सर्वांना सोबत घेऊन विकासकामे केली. लोकहिताला प्राधान्य दिले तर कामे यशस्वी होतात हे बोराळे गावाला भेट दिल्यावर अनुभवण्यास मिळाले. सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांचे प्रयत्न, लोकसहभाग यामुळे बोराळे गाव जिल्ह्यातील आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे. पाणी पुरवठा योजनेत गावातील काम अतिशय उत्कृष्ट असून गावाने वैयक्तिक नळ जोडणीला प्राधान्य देत सार्वजनिक नळ कोंडाळे बंद केले आहेत. एकाच ठिकाणी व्हाल्वचा प्रयोग नाविन्यपूर्ण व उपयुक्त असून याचे अनुकरण जिल्ह्यातील इतर गावांमध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
– इशाधीन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद नाशिक