नांदगाव – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती समोर झालेल्या या आंदोलनात हे विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी तहसिलदारांना निवेदनही देण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की, उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक ,शेतकरी मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक भाजपा सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले आहे. सदरच्या विधेयकामुळे देशी विदेशी कंपन्या शेती व्यवसायात उतरतील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येऊन हजारो लोक बेरोजगार होतील. यासारखे सविस्तर मुद्दे मांडले आहे.
हे धरणे आंदोलन माजी आमदार अँड.अनिलदादा आहेर,जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस आर्कि अश्विनीताई आहेर यांच्या सूचनेवरून नांदगाव तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतूत्वाखाली करण्यात आले.
या धरणे आंदोलनात युवक काँग्रेसचे दर्शन आहेर, कैलास गायकवाड, उदय पाटील, पुंडलिक सदगीर,जितेंद्र देशमुख, शब्बीर शेख, योगेश वाघ, किरण जाधव, रोशन आहेर,किशोर वाघ, नारायण सदगीर, एकनाथ बोराडे,निरंजन आहेर,सागर जाधव, अक्षय कासलीवाल, प्रवीण घोटेकर, ज्ञानेश्वर अहिरे, सागर साळुंकेनी आदीसह व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे, शहर प्रमुख सोनू पेवाल यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा दिला.