नांदगाव आणि येवला तालुक्यांचा घेतला कोव्हीड १९ उपाययोजनांचा आढावा
मनमाड – कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी नांदगाव तालुक्यात आठ दिवसात ऑक्सिजन लाईन सह विशेष कोविड सेंटर (डीसीएचसी) सुरू करावे असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड १९ चा आढावा व उपाययोजनांबाबत मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालयातील सभागृहात बैठक झाली.त त्यात नांदगाव आणि येवला या तालुक्यांचा कोरोना संसर्गाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी भुजबळ म्हणाले की, येवला शहर व तालुक्यात कोरोना आटोक्यात आला असला तरीही त्याचा संसर्ग होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. येवला उपजिल्हा रुग्णालयाचे उर्वरित काम १५ दिवसांच्या आत सुरू करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिले.
खाजगी डॉक्टरांची मदत घ्या
येवल्याच्या धर्तीवर नांदगाव, मनमाड येथील कोमॉर्बीड रुग्णांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. या रुग्णांना योग्य ते औषधोपचार करून त्यांवर लक्ष ठेवण्यात यावे. येणाऱ्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढला तरी प्रशासनाने त्यासाठी पूर्ण तयारी ठेवावी. तसेच नांदगाव, मनमाड येथे कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध राहतील अशी व्यवस्था करण्यात यावी. येथे आवश्यक असल्यास खाजगी डॉक्टरांची मदत घेण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.
योग्य समन्वय ठेवा
नांदगावमध्ये डिसीएचसी सेंटर लवकरात लवकर उभारावे. कोरोनावर उपाययोजना सुरू असताना अर्थचक्र नियमित सुरू करण्याबाबत नागरिकांचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांची आहे. कोविड संदर्भातील उपाययोजनांमध्ये काही त्रुटी असतील तर योग्य समन्वयाने त्या दूर कराव्यात. उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करावा, असेही निर्देश भुजबळ यांनी दिले. कोरोना संसर्गासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.
पीककर्जाचा आढावा
येवला, नांदगाव तालुक्यातील पीक कर्ज आणि पाणीपुरवठा याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी आढावा घेतला. तालुक्यामध्ये लवकरात लवकर पीक कर्जाचे वाटप करावे आणि जिल्ह्यातील धरण साठ्याची सद्यपरिस्थिती बघता पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे, यासाठी वितरण व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यात याव्या, असेही निर्देश श्री. भुजबळ यांनी दिले. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे यांनी चर्चेत भाग घेऊन विविध सूचना केल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने येवला व नांदगाव येथे तालुकास्तरावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार सुहास कांदे, येवला नगरपालिका नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नांदगाव नगरपालिका नगराध्यक्ष बबीभाऊ कानडे, मनमाड नगरपालिका नगराध्यक्ष गणेश धात्रक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निखिल सैंदाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार, प्रांताधिकारी सोपान कासार, नांदगाव तहसीलदार उदय कुलकर्णी, येवला तहसीलदार रोहिदास वारुळे, येवला नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, नांदगाव नगरपालिका मुख्याधिकारी गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ अशोक ससाणे, डॉ रोहन बोरसे, डॉ गायकवाड यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.