नाशिक – नांदगावचे रहिवासी व पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाले. मृदू स्वभाव असलेले राजेंद्र सरग आपल्या मित्र परिवारात जिव्हाळ्याचे आणि मानाचे स्थान मिळवून होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते जिल्हा माहिती अधिकारी पदापर्यंत पोहोचले होते. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले.
नांदगाव येथील रेल्वे लायब्ररीमध्ये त्यावेळी ते नियमितपणे जात असत, कारण त्यांना वाचनाचे व व्यंगचित्राचे खूप वेड होते. या वेडातूनच त्यांच्यातील एक व्यंगचित्रकार घडत गेला. औरंगाबाद येथे अनेक वृतपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून काम केल्यावर सध्या ते जिल्हा माहिती अधिकारी ( पुणे ) या पदावर कार्यरत होते. शासकीय विभागात कार्यरत असले तरी उत्तम वार्तांकन कौशल्य , संगणकावर प्रभुत्व , व्यापक जनसंपर्क , हसतखेळत काम करण्याची त्यांची वृत्ती होती. सतत कार्यरत राहण्यातच खरा आनंद असतो हे आपल्या आचरणातून दाखवणारे राजेंद्र सरग हे चांगले व्यंगचित्रकार होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनायातील अत्यंत कार्यक्षम अधिकारी राजेंद्र सरग त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रांतील अनेक पत्रकारांचा जवळचा मित्र हरपला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.