नांदगाव – नांदगावचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर गंगाधर मोकळ यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील एक तारा निखळला. प्रभाकर मोकळ यांचे वडील गंगाभाऊ मोकळ यांनी आपल्या कार्यकाळात संपूर्ण नांदगाव शहरात समाजवादी चळवळ रुजविली, वाढवली, टिकवली. सुमारे चाळीस वर्षे नांदगाव शहरावर समाजवादी विचाराने, चळवळीने अधिराज्य गाजविले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहून त्याला उभारी देण्याचे काम गंगाभाऊ मोकळ यांनी केले. त्यांचाच वारसा पुढे प्रभाकर मोकळ यांनी चालविला. त्यांनीही आपल्या कामकाजाचा ठसा नांदगाव शहरावर उमटविला. त्यांनीही नांदगावचे नगराध्यक्ष पद भूषविले. त्यांचे काळात नांदगाव शहरात विकासाची अनेक कामे झाली; याहीपेक्षा त्यांनी समाजवादी विचार व चळवळीला बळ दिले. अनेक रस्त्यावरची आंदोलने त्यांनी केली. प्रभाकर मोकळ हे नेमस्त प्रवृत्तीचे. परंतु लढ्यात त्यांचे आक्रमक रुप अनेकदा बघावयला मिळत असे.