नवी दिल्ली मुंबई – राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, गेल्या फेब्रुवारी महिन्यात जयस्वाल यांची दिल्लीच्या आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. दिल्लीत राज्य निवडणूक असल्याने तत्कालिन आयुक्तांची निवृत्ती येऊन ठेपली होती. मात्र, निवडणुकीत नव्या आयुक्तांची नेमणूक करणे योग्य नसल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने तत्कालिन आयुक्तांना मुदतवाढ दिली. मात्र, त्यानंतर आयुक्तपदी जयस्वाल रुजू होतील, अशा वार्ता जोरदार आल्या. गृह मंत्रालयानेही त्याबाबत दुजोरा दिला. प्रत्यक्षात जयस्वाल यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले नाहीत. अखेर १० महिन्यानंतर जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते अखेर दिल्लीत गेले असले तरी ते आता महासंचालक पदाचा कारभार सांभळणार असून निवृत्तीपर्यंत ते या पदावर राहणार आहेत.