नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटल व नवीन बिटको हॉस्पिटल या ठिकाणी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नवीन हॉस्पिटल मधील सिटीस्कॅन मशिन तसेच लॅबच्या कामकाजाची माहिती घेतली. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना असणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या ठिकाणी एक हजार बेड नव्याने सुरू करून रुग्णांची व्यवस्था करण्याच्या सूचना या पाहणीच्या वेळी दिल्या. तसेच या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भोजन,चहा, पाणी,नाष्टा आदी वेळेवर नित्यनियमाने मिळत असल्याबाबतची विचारपूस केली.
तसेच या दोन्ही रुग्णालयात असणारा औषध साठा याची माहिती घेऊन सध्या उपलब्ध असणारा औषध साठा लक्षात घेऊन आठ दिवस पूर्वी नवीन औषध साठा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय विभागाला दिल्या. रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ३० सुरक्षारक्षक ठेवण्याची बाबत सूचना करण्यात आल्या. या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणारे कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू नये यासाठी तातडीने वैद्यकीय सेवा देणार यांची नियुक्ती करून वैद्यकीय सेवा देण्याच्या कामास गती देण्याच्या सूचनाही दिल्या. नवीन बिटको हॉस्पिटल बाबत डॉ. जितेंद्र धनेश्वर व जुन्या बिटको हॉस्पिटल बाबत डॉ. राजेंद्र भंडारी यांनी कामकाजाबाबतची सविस्तर माहिती दिली.
या दोन्ही रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याच्या सूचना वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना यावेळी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी दिल्या. स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यासमवेत नगरसेवक जगदीश पवार,डॉ.जितेंद्र धनेश्वर, डॉ.गणेश गरुड, डॉ.राजश्री गवारे,विभागीय अधिकारी अधिकारी डॉ.दिलीप मेनकर आदी उपस्थित होते.