पुणे – कोरोनामुळे लांबलेल्या पदवी व पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे वेळापत्रक अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केले आहे. देशभरात प्रथम वर्षाचे वर्ग १ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत. तर महाराष्ट्रातील परीक्षा ऑक्टोबरमध्ये संपणार असल्याने १८ नोव्हेंबरपासून वर्ग सुरू करण्याची परवानगी यूजीसीने दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु होत असल्याने यंदा दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील तसेच राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिक्षण क्षेत्राला याची मोठी झालं सोसावी लागली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वी दोन वेळा शैक्षणिक संस्था सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांची अमंलबजावणी करणे शक्य झाले नाही. परंतु आता यूजीसीने नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबर पर्यंत प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा लॉकडाउनमुळे खोळंबल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर या परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. त्यानंतर प्रथम वर्षाचे वर्ग कसे सुरू करायचे नियोजन करण्यासाठी यूजीसीने समिती गठित केली होती. महाविद्यालयांनी प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी किंवा रिक्त जागा भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. तर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत आहे.
असे असणार नवे शैक्षणिक वर्ष…
प्रथम वर्षाची प्रवेश परीक्षा पूर्ण करणे – ३० ऑक्टोबर २०२०
प्रथम वर्षाचे वर्ग सुरु करणे – १ नोव्हेंबर २०२०
परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी ( पीएल ) ( प्रथम सत्र ) – १ ते ७ मार्च २०२१
प्रथम सत्र परीक्षा – ८ ते २७ मार्च २०२१
प्रथम सत्र सुट्ट्या – २७ मार्च ते ४ एप्रिल २०२१
दुसऱ्या सत्राची सुरुवात – ५ एप्रिल २०२१
परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी ( पीएल ) ( द्वितीय सत्र ) – १ ते ८ ऑगस्ट २०२१
द्वितीय सत्र परीक्षा – ९ ते २१ ऑगस्ट २०२१