नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूने मोठीच दहशत निर्माण केली आहे. वाढता धोका आणि रुग्णालयातील वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशभरात पुन्हा लॉकडाउन लागू केला आहे.
जॉन्सन म्हणाले की, या प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आम्ही फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत स्टे- अॅट होम (घरीच राहा) असे नागरिकांना आवाहन करीत लॉकडाउन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीपासून हा साथीचा रोग पसरला असल्याने आमचा देश कोरोनाविरूद्ध लढण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे गुंतलेला आहे. तसेच जुन्या कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात आमचे सामुहिक प्रयत्न सुरू आहेत, यात काही शंकाच नाही आणि आम्ही हे सातत्याने करत राहू. परंतु आता नव्या कोरोनाचा विषाणू वेगाने पसरत असल्याने मागील विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य दिसत आहे.
नागरिकांना पुन्हा एकदा घरीच रहावे लागेल, कारण नवीन विषाणू अत्यंत धोकादायकपणे पसरत आहे. कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे रुग्णालयांमधील गर्दी वाढत आहेत आणि साथीच्या आजारानंतरची ही लॉकडाऊन पहिलीच वेळ आहे. मंगळवारपासून (५ जानेवारी) शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद राहतील व ही सर्व ऑनलाइन सुरू होतील, असे त्यांनी सांगितले. नागरिक केवळ आवश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर जाऊ शकतील.