नवी दिल्ली – कोरोना लसीच्या वापराला तातडीने मंजुरी मिळाल्यानंतर आता सुमारे ९ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा उघडण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १५ जानेवारीपासून उघडण्याची योजना सुरू आहे. याबाबत पालक व शिक्षकांशीही चर्चा सुरू झाली आहे.
शाळा सुरू करण्याबाबतची सर्व घटकांची भूमिका सकारात्मक असल्यास, गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा उघड्या दिसून येतील. विशेषतः नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. या योजनेनुसार नववी ते बारावीच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना दि. १५ जानेवारीनंतर वेगवेगळ्या दिवशी फोनकॉल करून शाळेत बोलविण्यात येईल.
दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा दि.४ मेपासून आणि त्यापूर्वी दि. १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. या विद्यार्थ्यांचा अभ्यास संपूर्ण वेळ ऑनलाइन घेतला गेला, परंतु काही विद्यार्थ्यांमध्ये त्याकाळात चांगली कामगिरी होऊ शकली नाही. कोरोना संकटाच्या दरम्यान शाळा उघडण्याच्या घोषणा यापूर्वी अनेकदा झाल्या. परंतु या काळात शिक्षकांचा व पालकांचा सल्ला घेण्यात आला. मात्र संसर्गाचा धोका लक्षात घेता, बहुतेक पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत एकमत दर्शविले नव्हते. तथापि, आता मात्र कोरोना लस मंजूर झाल्यानंतर पुन्हा एकदा शाळा उघडण्याच्या हालचाली सुरू आहेत.