वॉशिंग्टन – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कितीही जनजागृती केली, प्रयत्न केले तेव्हा त्याला जरा आळा बसला. पण आता, त्याचे नवनवीन प्रकार येताना दिसत आहेत. हे नवीन स्ट्रेन रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक टूल विकसित केले आहे. यामुळे नवीन व्हायरसवरील लस शोधणे सोपे जाणार आहे. कोरोनाचे नवनवे आणि काही प्रमाणात घातक प्रकार समोर येत असताना, हे टूल निश्चितच आपल्या फायद्याचे ठरणार आहे.
लस शोधताना फायदा
‘सायंटिफिक रिपोर्ट’ नावाच्या या जर्नलमध्ये याबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे, याच्या सहाय्याने आपल्याला या व्हायरसमध्ये होणारे बदल लगेच कळू शकतात. अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या (युएससी) शास्त्रज्ञांच्या मते, लस शोधताना याचा उपयोग होऊ शकतो. आणि जी लस शोधण्यासाठी सध्या महिने किंवा वर्ष लागतात, ती प्रक्रिया पूर्ण व्हायला कमी अवधी लागेल.
परीक्षणही शक्य
युएससीचे असोसिएट प्रोफेसर पॉल बोगडन यांनी सांगितले की, कोरोनाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन त्यावर कोणती लस प्रभावी ठरेल, याचा ताबडतोब शोध लागेल. आणि त्याचे परीक्षणही करणे शक्य होईल.
संशोधनादरम्यान, कोरोना व्हायरसवरील उपाय म्हणून जेव्हा या टूलचा वापर करण्यात आला, तेव्हा लगेचच त्यावर उपाय ठरू शकणाऱ्या २६ लसींची माहिती समोर आली. यातील शास्त्रज्ञांनी ११ लसी निवडल्या आणि तयार केल्या.
स्पाईक प्रोटीन करणार नष्ट
कोरोना ज्या पेशींमुळे शरीरात प्रवेश करतो, ते स्पाईक प्रोटीनच ही लस नष्ट करेल. तसेच या व्हायरसला ती निष्क्रीय करून टाकेल. परिणामी, तो शरीरात पसरू शकणार नाही.