प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारे असून त्यात शिक्षणाबरोबरच संशोधनावर भर दिला असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज (७ ऑगस्ट) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ‘उच्च शिक्षणात परिवर्तनात्मक सुधारणांसंबंधीच्या संमेलना’चे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करताना बोलत होते.
या धोरणाद्वारे विद्यार्थांना जागतिक दर्जा शिक्षण दिले जाणार असून, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच दिले जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होईल, असे ते म्हणाले. हे शैक्षणिक धोरण भविष्याचा विचार करुन तयार केलेले असून, यात शिक्षण आणि संशोधनातली दरी कमी केली असून, सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे, असे ते म्हणाले. आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी हे शैक्षणिक धोरण अत्यंत उपयुक्त असल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.