नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला यंदापासून बहुतांश ठिकाणी सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या नवीन विषयांना शाळांच्या नव्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करून शिकवण्याच्या योजनेवरही शिक्षण विभाग कार्य करत आहे.
केंद्र सरकारने सध्या तयार केलेल्या या योजनेंतर्गत, २०२२ च्या नवीन शैक्षणिक सत्रापासून शालेय मुलांना नवीन अभ्यासक्रमांतर्गत तयार केलेल्या पध्दतीने शिक्षण दिले जाईल. अशा परिस्थितीत यावर्षी नव्या अभ्यासक्रमाची तयारीही केली जाईल. याच्या अंमलबजावणीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने तयार केलेल्या संकल्प व मार्गदर्शनात (रोडमॅपमध्ये) तीनशेहून अधिक कामे समाविष्ठ गेली आहेत. यातील सुमारे ८० टक्के कामे या वर्षापासून सुरू होतील. यासाठी तज्ज्ञ शिक्षकांवर जबाबदारी व त्याची अंतिम मुदत दोन्ही निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, त्याची अंमलबजावणी करताना संपूर्ण जबाबदारी राज्यांची असल्याने धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यांशी संपर्क करून वारंवार बैठका घेण्यात येत आहेत.