नाशिक – ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांसाठी नवीन वर्षात नवे लेखक आणि सदर भेटीस येत आहेत. ‘नवे वर्ष, नवे सदर, नवे लेखक’ याद्वारे ‘सप्तरंगी सदरांचा वाचनीय खजाना’ वाचकांना भेटणार आहे. गेल्या पाच महिन्यात ‘इंडिया दर्पण’च्या सातही सदरांना उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आताही हा प्रतिसाद कायम राहत आणखी नवा मैलाचा दगड प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘इंडिया दर्पण’ने अवघ्या १५० दिवसातच तब्बल १० लाख दर्शक मिळविण्याचा टप्पाही पार केला आहे.
प्रा. डॉ. प्रसाद जोशी हे दर सोमवारी ‘भन्नाट’ या सदराद्वारे तरुण उद्योजकांची यशकथा वाचकांसमोर आणणार आहेत. गेल्यावेळी ‘स्टार्टअप की दुनिया’द्वारे त्यांनी अनेक उद्योगांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकला होता. ज्येष्ठ लेखक आणि प्रा. दिलीप फडके हे परिचित-अपरिचित चेहऱ्यांची ओळख ‘वलयांकित’ सदराद्वारे दर मंगळवारी करुन देणार आहेत.
ज्येष्ठ पक्षी निरीक्षक आणि पर्यावरण तज्ज्ञ सतीश गोगटे हे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम घाटातील जैविक वैविध्याची खरी माहिती ‘निसर्ग भेट’द्वारे दर बुधवारी वाचकांना देणार आहेत. सर्वोच्च न्यायालयापासून विविध उच्च न्यायालय आणि खंडपीठ हे सुनावणीच्या माध्यमातून निकाल देत असतात. मात्र, दर आठवड्यातील विविध सुनावणींचा आणि निकालांचा अन्वयार्थ समजून सांगणार आहेत ज्येष्ठ विधीज्ञ अॅड देविदास शेळके. दर गुरुवारी त्यांचे ‘ऑर्डर ऑर्डर’ हे सदर वाचकांच्या भेटीला येईल.
ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रा. लक्ष्मण महाडिक हे आताही ‘कवी आणि कविता’ या सदराद्वारे राज्यातील कवी आणि कवयित्रींची काव्य सफर घडविणार आहेत. यावेळी कवींच्या आवाजातील कविताही ऑडिओ-व्हिडिओ रुपाने वाचकांना भेटतील. अलिकच्या काळात ट्रेकिंगचा ट्रेंड वाढला आहे. अशाच ट्रेकिंगच्या ठिकाणांची ओळख करुन देणारे ‘चला भटकायला’ हे सदर लिहीणार आहेत ज्येष्ठ गिर्यारोहक सुदर्शन कुलथे. दर शुक्रवारी ते वाचकांना एका साहसी पर्यटन स्थळाची भटकंती घडवतील. तर, ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांचे अतिशय लोकप्रिय ‘तरंग’ हे सदर वाचकांना यंदाही भेटीस राहणार आहे. याद्वारे आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा परखड परामर्श वाचकांना वाचायला मिळणार आहे.
या सर्व लेखकांची आणि त्यांच्या लेखणीतून प्रसिद्ध होणारी मते आणि मतांतरे यांची वाचकांना मोठीच उत्सुकता आहे. येत्या रविवारपासून (३ जानेवारी) हे सर्व लेखक आणि सदरे भेटीला येणार आहेत.
हे सर्व सदर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22