नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षातील असंतोष आणि नाराजी नाट्यच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्याचे काम सुरु केल्याचे वृत्त आहे. यासंबंधी माहिती देतांना निवडणूक प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले की, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, अध्यक्षपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागेल. या निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी चार-पाच दिवसांचा अवधी आहे. यानंतर नामनिर्देशन तपासणी व उमेदवारी अर्ज मागे घेण्यास वेळ देण्यात येईल. जर निवडणुका आवश्यक असतील तर मतदानासाठी आणि मतमोजणीसाठी देखील वेळ आवश्यक आहे.
दरम्यान, पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या निवडणूकीची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली असून काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत निवडणुकीच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर हा कार्यक्रम जाहीर केला जाईल. या निवडणुकीत पक्ष प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. यासाठी डिजिटल पद्धतीने मतदान केले जाईल. पक्षाने एआयसीसी सदस्यांना प्रथमच डिजिटल मतदार कार्डदेखील जारी केली आहे. या कार्डमध्ये मतदाराशी संबंधित सर्व माहिती असेल.