पुणे – राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज पुणे शहरात समाज कल्याण विभागाच्या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या वसतीगृहे इमारतींची पाहणी केली. येरवडा येथे सामाजिक न्याय भवन परिसरात 1000 क्षमतेचे मुला-मुलींचे वसतीगृह उभारण्यात आले आहे. सदर इमारतीमधील युनिट 3 व 4 या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून किरकोळ काम बाकी राहिले आहे. काही प्रमाणात दुरुस्त्या करण्याबरोबरच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी काही बदल आवश्यक असल्याचे त्यांनी यावे सांगितले. यासाठी वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठक आयोजित सूचना त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
त्याचप्रमाणे आयुक्त यांनी सायंकाळी पुणे विद्यापीठ परिसरात सामाजिक न्याय विभागाने उभारलेल्या दोन वसतीगृहे इमारतींची देखील पाहणी केली. सदर वसतीगृहाचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ झाला पाहिजे अशी आशा व्यक्त केली व या संदर्भात देखील वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करण्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सुचित केले. यावेळी आयुक्त यांनी पूर्ण झालेल्या बांधकामाच्या गुणवत्ता बाबत देखील कोणत्याही पद्धतीची तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले. दर्जेदार व गुणवत्तापूर्वक बांधकामासाठी समाज कल्याण विभाग आग्रही असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी त्यांच्या समवेत बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सह आयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, विद्यापीठाचे अभियंता आर.व्ही. पाटील, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.