नवीन वर्षात शनी काय परिणाम करणार? (भाग १)
२०२१ मध्ये प्रत्येक राशीला शनीमुळे होणारे शुभाशुभ परिणाम आपण जाणून घेणार आहोत.
शनीची साडेसाती म्हटले की प्रत्येकाला त्याच्या परिणामांचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही शनी जरी राशीबदल करणार नसला तरी २२ जानेवारी च्या दरम्यान तो नक्षत्र बदल जरूर करणार आहे. मागील वर्षात उत्तरा षाढा या रवीच्या नक्षत्रात शनी होता. तरी यंदा तो चंद्राच्या श्रवण नक्षत्रात प्रवेश करत आहे. शनीचे नक्षत्र बदल केल्यास प्रत्येक राशीला त्याचे शुभाशुभ परिणाम जाणवतात.
साडेसाती म्हणजे काय?
प्रथम आपण साडेसाती म्हणजे काय हे प्राथमिक रिता समजून घेऊ प्रत्येक ग्रह काही ठराविक वर्ष किंवा महिने एका राशीमध्ये स्थित असतो त्याचप्रमाणे शनी अडीच वर्ष एका राशीत स्थित असतो. शनीची साडेसाती म्हणजे एकावेळी तीन राशींना अडीच अडीच अडीच अशा पद्धतीने ती विभागलेली असते. यावेळी एप्रिल २०२२ पर्यंत जी अडीचकी आहे ती धनु राशीला तिसरी, मकर राशीला दुसरी, कुंभ राशीला पहिली अशी विभागलेली आहे. म्हणजेच मकर राशीला साडेसाती सुरू आहे. नवग्रहांमध्ये शनी ग्रह हा न्याय देवता ग्रह मांडलाय. म्हणजेच साडेसातीच्या पूर्व काळामध्ये आपल्या हातून जी कर्म होतात त्या कर्माचे फळ स्वरूप साडेसातीच्या मधल्या अडीचकी मध्ये शनी आपल्या पदरात टाकतो, अशी मान्यता आहे.
आपले कर्म जर नीट असेल आपण कोणाला दुखावले नसेल कोणतेही वाईट कृत्य आपल्या हातून घडली नसतील जाणता, अजाणता काही चुका झाल्या असतील तर शनीच्या साडेसातीला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे शास्त्र सांगते. हनुमान भक्तांना शनीपीडा देत नाही अशीही मान्यता आहे. अनेक पौराणिक कथांनुसार हनुमानाने वेळोवेळी शनीला आपली शक्ती दाखवून निष्प्रभ केलेल्या आहे. त्यामुळे शनी हनुमान भक्तांच्या वाटेला जात नाही असे म्हणतात.
२०२१ साला वर विविध राशी वर शनीचे शुभाशुभ परिणाम पुढील प्रमाणे जाणवण्याची शक्यता आहे. त्यातील एक एक रास वाचकांच्या आग्रहास्तव सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करीत आहे.
मेष रास व शनी परिणाम
मेष राशीच्या दशम भावांमध्ये शनी येत असल्यामुळे त्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ते प्रथम पाहू.. मेष राशी वाल्यांनी आपल्या वरिष्ठांशी तसेच ज्येष्ठ मंडळीं सोबत वाद टाळावेत. कौटुंबिक मतभेद चार भिंतीच्या आत मिटवावेत. ऑफिसात व्यवसायाच्या ठिकाणी ताण-तणाव योग्य वेळीच नष्ट करावे. हाडाच्या दुखण्यावर विशेष लक्ष द्यावे. मनस्वास्थ्य व शारिरीक स्वास्थ्य त्याचा समतोल साधावा अनिद्राची समस्या जाणू शकते. विरोधकांकडून जुने वाद उकरून काढले जाऊ शकतात त्याबाबतही काळजी घ्यावी.
मेष राशीसाठी शनीचे शुभ परिणाम
अनपेक्षितपणे चांगली नोकरी लागणे, मनासारखी व्यवसाय वृद्धी होणे, परदेशगमन योग, मोठ्या खरेदीची शक्यता, अपरिचित कडूनही ऐनवेळी योग्य ती मदत मिळेल. बरेच दिवस रखडलेले प्रमोशन मिळेल. अशा पद्धतीने मेष राशीसाठी शनि या वर्षाचे शुभाशुभ परिणाम घेऊन येत आहे.
शनी म्हणजे कर्माचा न्यायाधीश
अतिशय कठोर तपश्चर्येमुळे भगवान शंकरांनी शनीला नवग्रह मधला न्यायाधीश होशील, असा आशिर्वाद दिला. त्यामुळे कुंडलीतील नवग्रहांमध्ये शनीला आपल्या कर्माचा न्यायाधीश असे मानले जाते. त्यामुळे ज्योतिषी देखील कुंडलीतील शनीचे स्थान शनीची महादशा अंतर्दशा शनीची युती, शनीच्या अंशात्मक स्थान या सर्वांचा अभ्यास आधी करतात. त्यानंतरच बाकी ग्रहांचे निरीक्षण केले जाते.. गुरु ग्रह हा कर्म निश्चित करतो तर शनी हा केलेल्या कर्मानुसार फलप्राप्ती देतो, अशी मान्यता आहे.
शनीचे २०२१ मध्ये आपल्या राशीवरील शुभाशुभ परिणाम या लेखमालेत उद्या आपण पुढच्या राशीबद्दल माहिती घेऊ.