नवी दिल्ली – २०२०च्या वाईट अनुभवानंतर सर्वजण आतुरतेने नवीन वर्षाची वाट पहात आहोत. खगोलप्रेमी तर विशेष वाट पाहात आहेत, कारण या नवीन वर्षात आपल्याला ४ ग्रहणे दिसणार आहेत. यातील एक संपूर्ण सूर्यग्रहण आणि संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. अर्थात, यातील केवळ दोन ग्रहणे भारतातून दिसतील.
उज्जैन येथील जीवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्र प्रकाश गुप्त यांनी सांगितले की, २६ मे रोजी होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाने नवीन वर्षातील खगोलीय घटनांची सुरुवात होईल. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जेंव्हा पृथ्वी येते आणि चंद्राला पूर्ण झाकून टाकते, तेंव्हा चंद्रग्रहण होते. यावेळी चंद्र रक्तवर्णीय दिसतो, त्यामुळे याला ‘ब्लड मून’ही म्हटले जाते. हे ग्रहण सिक्कीम व्यतिरिक्त पूर्वेकडील राज्ये, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरील काही भागात दिसेल. कारण या भागात देशातील इतर भागांच्या तुलनेत चंद्रोदय लवकर होतो. यावेळी पृथ्वीच्या छायेने चंद्र १०१.६ टक्के झाकला जाईल, असे डॉ. गुप्त यांनी सांगितले.
या चंद्रग्रहणानंतर १० जून रोजी सूर्यग्रहण होणार आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते. पण, हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. १९ नोव्हेंबर रोजी होणारे आंशिक चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागातून अत्यंत कमी वेळासाठी दिसेल. यात चंद्र पृथ्वीच्या छायेमुळे ९७.९ टक्के झाकलेला दिसेल. आगामी वर्षाच्या शेवटी, ४ डिसेंबरला संपूर्ण सूर्यग्रहण होईल. मात्र, हे शेवटचे ग्रहण भारतातून दिसणार नाही. दरम्यान, २०२०मध्ये २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहणे दिसली होती.