नवी दिल्ली – २०२० या वर्षाने आपल्याला अनेक धडे दिले आहेत. त्यातीलच एक आणि सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे बचतीची सवय आणि पैशांचा योग्य वापर. म्हणूनच या नव्या वर्षात आपण योग्य आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
२०२० मध्ये कोरोना आला आणि सगळं नियोजनच बिघडून गेलं. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली अनेकांच्या नोकरीवर गदा आली. हातावर पोट असणाऱ्यांचे तर बरेच हाल झाले. यात ज्यांनी कर्ज काढली होती, ज्यांचे हप्ते जात होते, ज्यांनी योग्य पद्धतीने गुंतवणूक केली नाही असे सारेच फार मोठ्या आर्थिक संकटात सापडले. येणाऱ्या नवीन वर्षात तरी आपल्याला अशा त्रासांना सामोरे जावे लागू नये यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातही जर तुमच्या कर्जाचे हप्ते बाकी असतील तर तुम्ही आगामी वर्षात खूप संयमाने आणि काटकसरीने वागणे गरजेचे आहे.
आपली मिळकत आणि खर्च याचा ताळमेळ ठेवा : महिन्याला आपल्याला मिळणारी रक्कम किती आणि महिन्याचा एकूण खर्च किती, याचा अंदाज घ्या. त्यानंतर जे खर्च करणे आवश्यकच आहे, अशा गोष्टींचा आढावा घ्या.
अनावश्यक खर्चात कपात करा : जे खर्च टाळता येणारच नाहीत, त्याचा अंदाज आल्यावर त्यासाठी महिन्याला किती रक्कम लागेल ते पहा. याशिवाय जे काही खर्च होत असतील ते शक्य होतील तेवढे कमी करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च लिहायची सवय लावा.
कर्जाचे हप्ते, गाडीचा इएमआय, घराचे भाडे असे जे काही खर्च असतील, त्याचे पैसे महिन्याच्या महिन्याला वेळेत जातील असं पहा. ते बँकेतून थेट ठरलेल्या दिवशी जातील याची व्यवस्था करा.
कर्ज लवकरात लवकर फेडायचं असेल आणि तुमची गुंतवणूक चांगली असेल तर दर महिन्याला नियोजित हप्त्यापेक्षा जास्त रक्कम भरा.