नाशिक – नव्याने आलेला स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने त्याबाबत प्रशासनाने सतर्क राहून काळजी घेण्यात यावी, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस उपाधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के.आर. श्रीवास, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
परदेशी प्रवासी
तसेच नव्याने आलेल्या स्ट्रेनचा विचार करता मुंबई येथे येणाऱ्या परदेशातील प्रवाशांची ट्रॅव्हलींग हिस्ट्री तपासून प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि त्यांना काही दिवसांसाठी मुंबईतच थांबवणे योग्य होईल, ज्यामुळे स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढणार नाही. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव हा जलद गतीने होत असल्याने ब्रिटन स्ट्रेनच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच परदेशातून मुंबईला येणाऱ्या प्रवशांपैकी कुणी प्रवासी जर नाशिकला येत असेल अशा प्रवाशांची माहिती नाशिक प्रशासनाला कळविण्यात यावी, असे मुंबई प्रशासनास सांगण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.
दीडपट सुविधा
कोरोना लसीकरणाबाबत नुकतास जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात आला असून जिल्ह्यात लस साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज क्षमता आवश्यतेपेक्षा दिडपटीने अधिक आहे. आणि लसीकरणासाठी जिल्हापातळीवर सर्व नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीच्या वेळी दिली.
कोविन अॅप
कोरोना लसीकरणाबाबत जिल्ह्यात नुकताच घेण्यात आलेला ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडला आहे. याच अनुषंगाने कोरोना काळात प्रामुख्याने काम करणारे सर्व संबंधित आरोग्य कर्मचारी यांना प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी प्राधान्य देण्यात यावे. तसेच पोलिस यंत्रणा व इतर संबंधित यंत्रणेची माहिती CoWin App वर भरण्यासाठी जमा करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात यावी, जेणे करून प्रत्यक्ष लसीकरणाची प्रक्रीया सुरू झाल्यावर ती व्यवस्थीतरित्या पार पडण्यास मदत होईल, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
सर्व रुग्णालयांचे ऑडिट
भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांच्या विद्युत व्यवस्थेची सार्वजनिक बांधकाम व अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येवून त्याबाबत नियमितपणे देखभाल दुरूस्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे फायर एक्स्टिंग्विशर हाताळणी संदर्भात देखील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने संबंधितांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. याचसोबत सर्व संबंधित यंत्रणांनी केलेल्या कामाचा अहवाल पालकमंत्री यांना बैठकीच्या दरम्यान सादर केला.