लुधियाना (हरियाणा) – शहरातील उच्चस्तरीय कुटुंबातील नवविवाहित जोडप्याला संरक्षण देण्यासाठी शहरातील दोन पोलिस ठाण्यातील पोलिसांची चांगली धावपळ झाली. ही सुरक्षा पुरवताना पोलिसांचा अक्षरशः घाम निघाला. दाम्पत्याला सुखरुप घरी नेल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
लग्नानंतर लुधियाना येथे पोहोचलेले नवविवाहित जोडपे सत्र न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी संरक्षणाची मागणी केली. यापैकी वर हा हैबोळ भागातील असून वधू हरियाणा नाजिकच्या गुरगाव येथील आहे. दोघेही गुरगावमध्ये एकाच कंपनीत काम करतात. कंपनीतच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. परंतु त्यांच्या कुटुंबियांकडून लग्नाला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे दोघेही पळून गेले आणि लग्न करुन लुधियानाला आले.
वधूचे कुटुंब आणि नातेवाईक हे पोलिस खात्यात उच्च पदावर आहेत. मात्र त्यांना या लग्नाबद्दल खूप राग आला. त्यांनी पोलिस अधिकारी घेऊन वधूला परत घेण्यासाठी लुधियानाला गाठले. नवविवाहित जोडप्याने न्यायालयात धाव घेतली. याची दखल घेत सत्र न्यायालयाने नवविवाहित जोडप्याला सुरक्षित न्यायालयात आणून त्यानंतर त्यांना घरी सोडावे, असे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला बंदोबस्त दिला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवविवाहित जोडप्याच्या सुरक्षेसाठी पोलिस अक्षरशः धावपळ करीत होते. यात पोलिसांचा चांगलाच घाम निघाला. परिणामी, या विवाहाची केवळ हरियाणाच नाही तर देशभरात चर्चा होत आहे.