नाशिक – नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे फाउंडर मेंबर नंदू देसाई (गुरुजी) तसेच नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे पदाधिकारी मोहन देसाई या बंधूनी नववर्षानिमित्त “माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” हा संदेश घेऊन सतत बारा तास नववर्षानिमित्त सायकलिंग केली. यासाठी त्यांच्या सर्व कुटुंबाचे योगदान लाभले. त्यांचा मुलगा यश, गौरव तसेच देसाई फॅमिलीतील महिला अनिता,अनुराधा,आदीती , मीना, दीपिका यांनी देखील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सायकलिंग केली .आई कलावती देसाई या सुध्दा स्वतः गोल्फ क्लब मैदानावर उपस्थित होत्या.
सकाळी सात वाजता गोल्फ क्लब मैदान येथून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे व भाजपा नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राईडला सुरुवात झाली. गोल्फ क्लब- ए.बी.बी.सर्कल -जेहान सर्कल – अशोक स्तंभ – सी.बी.एस – त्रंबक नाका – गोल्फ क्लब असा १० किमीची फेरी सतत बारा तास रिले फॉरमॅटमध्ये देसाई बंधूंनी केली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची फॅमिली तसेच मित्रपरिवार व नाशिक सायकलिस्टचे मेंबर सामील झाले. यावेळी त्यांनी सायकल चालवा- पर्यावरण वाचवा हा संदेश दिला. सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन बारा तासात देसाई कुटुंब व मित्र परिवार,मिळुन १३०० किमी सायकलिंग केली व प्रदूषण मुक्तीचा संदेश दिला.
नाशिक सायकल चळवळीचे जनक किरण चव्हाण यांनी २०२१ हे इन्व्हरमेंट ईयर म्हणून घोषीत केले. व सर्व नागरिकांनी यासाठी पुढे यावे व गाड्यांचा वापर कमी करावा. देसाई परीवारानेच आपल्या कुटुंबापासून या चळवळीची सुरुवात केली याचे विशेष कौतुक नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी केले. बारा तास सायकलिंग पूर्ण केल्याबद्दल या कुटुंबाचे स्वागत करण्यासाठी सायंकाळी सात वाजता नाशिकचे महापौर सतीश नाना कुलकर्णी व नाशिक मध्यच्या आमदार देवयानीताई फरांदे हे उपस्थित होते. तसेच सायकलिस्ट परिवार, मित्रपरिवार उपस्थित होता.